सोलापूर
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( बुधवारी ) सोलापुरात एक हजार कोटींच्या
योजनांचा शुभारंभ केला. शिवाय सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नव्या
रेल्वेमार्गाची घोषणाही त्यांनी केली. ज्या कामाचं आम्ही भूमीपूजन करतो, त्या कामाचं उद्घाटनही आम्हीच करतो, असं म्हणत
मोदींनी गरीबांसाठी घरांच्या कामाचं भूमीपूजनही केलं.
आम्ही
ज्याचं भूमीपूजन करतो, त्याचं उद्घाटनही करतो, 30 हजार घरांचं भूमीपूजन झालं आहे, घर बांधून झाल्यावर
चावी देण्यासाठी मीच येणार. देखाव्यासाठी आम्ही काहीही करत नाही, अशी घोषणा करताच सोलापुरात उपस्थितांनी ‘मोदी, मोदी’च्या
घोषणा दिल्या.
ईशान्य
भारताला नेहमीच दुर्लक्षित ठेवल्याबद्दल मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ईशान्य
भारतातल्या राज्यांमध्ये एक किंवा दोन लोकसभेच्या जागा आहेत. त्यामुळे तिकडच्या
कामांकडे फार लक्ष देण्यात आलं नाही. जिथं एक दोन जागा आहेत तिथं कशाला खर्च
करायचा असाच काँग्रेसचा अजेंडा होता आणि तो आम्ही हणून पडला आहे. भाजपने ईशान्य
भारतात अनेक विकासकामं पूर्ण केली, तर अजूनही काही
कामं सुरु आहेत, असं मोदी म्हणाले.
सोलापूरला हवाई मार्गाने जोडणार
पंढरपूर आणि बाजूलाच तुळजापूरसारखं देवस्थान असलेला सोलापूर जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. देशातील अनेक शहरं हवाई मार्गाने जोडण्यात आले आहेत. लवकरच सोलापूर विमानतळही हवाई मार्गाने जोडणार असल्याची घोषणा मोदींनी केली.
कोणकोणत्या
कामांचं भूमीपूजन केले ?
सोलापुरातील
विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या 30 हजार घरकुलाचे
हस्तांतरण, स्मार्ट सिटीच्या कामाचं उद्घाटन, 180 कोटी रुपयांच्या ड्रेनेज योजनेचं उद्घाटन, देहू-आळंदी
पालखी मार्गाचं भूमीपूजन, तुळजापूर-अक्कलकोट राष्ट्रीय
महामार्गाचं भूमीपूजन अशा विविध कामांचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आलं.
सोलापूर
ते उस्मानाबाद या राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पणही मोदींच्या हस्ते करण्यात आलं.
सत्ता मिळाल्यानंतर 2014 मध्ये या रस्त्याच्या
चौपदरीकरणाला शुभारंभ मोदींच्याच हस्ते करण्यात आला होता, आज
चार वर्षांनी मोदींच्याच हस्ते या रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं.
नव्या
रेल्वेमार्गाची घोषणा
सोलापूर जिल्ह्यात रेल्वेचं जाळं आणखी वाढणार आहे. सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद या रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तुळजापूर हे देशभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग फायद्याचा ठरणार आहे.